परिचय

जीवन परिचय

लोकनेते रामशेठ ठाकूर
लोकनेते रामशेठ ठाकूर
न्हावा खाडीचा राम ते लोकनेते

लोकनेते रामशेठ ठाकूर

रामशेठ चांगू ठाकूर यांचा जन्म पनवेल तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या न्हावा खाडी या आगरी-कोळी समाजाच्या गावात, चांगू काना ठाकूर आणि भागूबाई (भागीरथी) यांच्या पोटी झाला. नऊ भावंडांमध्ये सर्वांत मोठ्या असलेल्या रामने बालपणी शेती, खाडीतील रेती काढणे आणि मजुरी करत शिक्षण घेतले.

रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत आणि साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे संस्कार घेऊन ते शिक्षक झाले. पुढे बांधकाम व्यवसायात यशस्वी उद्योजक, दोन वेळा कुलाबा (रायगड) मतदारसंघाचे खासदार, शिक्षणमहर्षी आणि दानशूर समाजसेवक असा त्यांचा प्रवास झाला. त्यांच्या दातृत्वामुळे जनतेनेच त्यांना ‘लोकनेते’ ही उपाधी दिली.

२
वेळा खासदार (१९९८, १९९९)
१९९३-९४
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची पहिली शाळा
थोर दानशूर
रयत शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ
७५
वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

शिक्षक ते उद्योजक

बी.ए. आणि बी.एड. पूर्ण केल्यानंतर राम ठाकूर सर पनवेलच्या वि. के. हायस्कूलमध्ये आणि त्यानंतर १९७४-७५ मध्ये सिडकोच्या वाशी येथील ‘दी फर्स्ट न्यू बॉम्बे स्कूल’ या नवी मुंबईतील पहिल्या शाळेत शिक्षक झाले. १९७६ मध्ये केवळ दहा हजार रुपयांच्या कामाने त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला. १ एप्रिल १९७८ रोजी तो ‘मेसर्स एस. सी. ठाकूर अँड ब्रदर्स’ या नावाने नावारूपाला आला. न्हावा-शेवा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलसारखी मोठी कामे त्यांनी पूर्ण केली.

शिक्षकी पेशाचा राजीनामा दिला, तरी त्यांच्यातील शिक्षक कधीच निवृत्त झाला नाही. व्यवसायातून मिळालेले ऐश्वर्य त्यांनी शाळा, महाविद्यालये आणि गरजूंच्या मदतीसाठी समाजाला परत दिले.

लोकनेता

१९८१ आणि १९८४ च्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनात त्यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्यासोबत सहभाग घेतला. १९९८ मध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून ते कुलाबा मतदारसंघातून खासदार झाले आणि १९९९ मध्ये पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून आले. संसदेत त्यांनी जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त, साडेबारा टक्के भूखंड आणि नवी मुंबई विमानतळ असे प्रश्न सातत्याने मांडले.

२००४ मध्ये त्यांनी स्वतः निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, पण समाजकारण आणि पक्षकार्य थांबवले नाही. २००४ मध्ये काँग्रेस आणि २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून त्यांनी रायगड व पनवेलच्या राजकारणाला नवी दिशा दिली.

परिवार

२४ फेब्रुवारी १९७३ रोजी त्यांचा विवाह ज्येष्ठ नेते जनार्दन भगतसाहेब यांच्या कन्या शकुंतला यांच्याशी झाला. त्यांना प्रशांत आणि परेश हे दोन सुपुत्र आहेत. प्रशांत ठाकूर पनवेलचे नगराध्यक्ष, आमदार आणि सिडकोचे अध्यक्ष राहिले आहेत.

आई-वडील आणि सासरे जनार्दन भगतसाहेब यांनाच ते आपले प्रेरणास्थान मानतात. म्हणूनच त्यांच्या नावाने शिक्षण संस्था आणि शाळा उभ्या राहिल्या आहेत.

ठाकूर परिवार
रामशेठ ठाकूर, सौ. शकुंतला ठाकूर आणि परिवार

वंशवृक्ष

न्हावा खाडीच्या ठाकूर कुटुंबाच्या चार पिढ्या.

स्व. चांगू काना ठाकूर
स्व. चांगू काना ठाकूर
वडील
स्व. भागूबाई (भागीरथी) ठाकूर
स्व. भागूबाई (भागीरथी) ठाकूर
आई
लोकनेते रामशेठ ठाकूर
लोकनेते रामशेठ ठाकूर
माजी खासदार
सौ. शकुंतला ठाकूर
सौ. शकुंतला ठाकूर
पत्नी
प्रशांत ठाकूर
प्रशांत ठाकूर
ज्येष्ठ सुपुत्र
आमदार, पनवेल
सौ. वर्षा ठाकूर
सौ. वर्षा ठाकूर
सून
अमोघ
अमोघ
नातू
अपूर्व
अपूर्व
नातू
परेश ठाकूर
परेश ठाकूर
धाकटे सुपुत्र
मा. सभागृह नेते तथा नगरसेवक
सौ. अर्चना ठाकूर
सौ. अर्चना ठाकूर
सून
आदेश
आदेश
नातू
आदित्य
आदित्य
नातू

भावंडे

नऊ भावंडांमध्ये राम सर्वांत मोठे.

  • रामशेठ
  • श्रीधर
  • स्व. गणनाथ
  • अनसूया
  • राधा
  • कृष्णा
  • भरत
  • चंद्रभागा
  • रत्नप्रभा

बालपण आणि शिक्षण

न्हावा खाडीचा राम

समुद्रकिनारी गेलेले बालपण

न्हावा खाडीच्या उत्तर पाड्यात राहणाऱ्या चांगू काना ठाकूर आणि भागूबाई यांचे राम हे पहिले अपत्य. वडिलांचा शेती हा मूळ व्यवसाय आणि खाडीतून रेती काढणे हा जोडधंदा. वडील कडक शिस्तीचे, स्वच्छता आणि टापटिपीचे आग्रही, तर आई अत्यंत शांत स्वभावाची. वडिलांसोबत पंढरपूर, आळंदी, गाणगापूर अशा यात्रांमधून रामवर लहानपणीच आध्यात्मिक संस्कार झाले.

१९५६ नंतर समुद्राचे पाणी रोखणारा गावाचा बंधारा फुटू लागला. शेती खाऱ्या पाण्याखाली गेली, गोड्या पाण्याचे स्रोत खारे झाले आणि अखेर ठाकूर कुटुंबाला गाव सोडून गव्हाणजवळच्या शिवाजीनगर वसाहतीत स्थलांतर करावे लागले. सुटीच्या दिवशी राम वडिलांसोबत मचव्यावर रेती काढायला, तर कधी पनवेल-उरण रेल्वेच्या कामावर दिवसाला एक रुपया मजुरीने जात असे.

न्हावा खाडीतील घर
न्हावा खाडीतील घराच्या आठवणी जागवताना रामशेठ ठाकूर
गव्हाण येथील जुनी शाळा
गव्हाण येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाची पत्र्याच्या शेडमधील जुनी शाळा

शालेय शिक्षण

१९५६-५७ मध्ये न्हावा खाडीच्या प्राथमिक शाळेत रामचे नाव दाखल झाले. पुढे माणगाव तालुक्यातील दगडधूम आणि उणेगाव येथे मामेभाऊ दशरथ पाटील यांच्याकडे तिसरी-चौथी, पुन्हा न्हावा खाडीत पाचवी-सहावी आणि गव्हाणला सातवी असे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.

जनार्दन भगत, दत्तूशेठ पाटील आणि दि. बा. पाटील यांच्या पुढाकाराने १९६३-६४ मध्ये गव्हाणला रयत शिक्षण संस्थेचे ‘छत्रपती शिवाजी विद्यालय’ सुरू झाले. सुरुवातीचे वर्ग धर्मा ठाकूर यांच्या घरात, अगदी गुरांच्या गोठ्याशेजारील पडवीतही भरले. पगार नसतानाही झटणाऱ्या शिक्षकांनी रामवर जे संस्कार केले, त्यातूनच त्याने शिक्षक होण्याचे ठरवले. अकरावीच्या (मॅट्रिक) परीक्षेत तो उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला.

प्रवास साताऱ्याचा

कर्मवीरांच्या कर्मभूमीत

त्या काळी पनवेलमध्ये उच्च शिक्षणाची सोय नव्हती. मुख्याध्यापक एस. बी. पाटील सरांच्या सल्ल्याने वयाच्या सतराव्या वर्षी राम मित्रांसोबत साताऱ्याला रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दाखल झाला. निघताना हरीकाकांनी हातावर ठेवलेले दहा रुपये आणि ‘खूप शिक’ हा आशीर्वाद त्याने आयुष्यभर जपला.

वसतिगृहात राहून, काटकसरीने शिक्षण घेत त्याने १९७२ मध्ये बी.ए. पदवी मिळवली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या माणूस घडविणाऱ्या विचारांनी ही चार वर्षे त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरली. त्यानंतर पनवेलच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयातून त्याने बी.एड. पदवी संपादन केली.

छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा
छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा
वि. के. हायस्कूल, पनवेल
बी.एड. नंतर पनवेलच्या वि. के. हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू

राजकीय प्रवास

आंदोलनातील रामशेठ

प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यात

नवी मुंबई उभारणीसाठी १९७० मध्ये सिडकोची स्थापना झाली आणि उरण, पनवेल, बेलापूर पट्ट्यातील ९५ गावांतील सुमारे ५५ हजार एकर जमीन संपादित करण्यात आली. योग्य मोबदल्यासाठी दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘जमीन बचाव संयुक्त लढा समिती’ने सुमारे १४ वर्षे संघर्ष केला.

१९८१ आणि १९८४ चे शेतकरी आंदोलन हे रामशेठ यांच्या आयुष्यातील धगधगते अग्निकुंड होते. १९८१ चे आंदोलन त्यांनी सोसले, तर १९८४ च्या आंदोलनात त्यांनी स्वतः उडी घेतली. या लढ्यातून साडेबारा टक्के विकसित भूखंड योजनेचा मार्ग मोकळा झाला. खासदार झाल्यावरही त्यांनी जेएनपीटी, सिडको आणि बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या, भूखंड आणि गावठाणातील घरांसाठी सातत्याने पाठपुरावा केला.

आंदोलनाचे नेतृत्व
‘कोण म्हणतो येणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय!’
नांदी राजकारणाची

खासदार रामशेठ ठाकूर

१९७९ – १९९७
शेतकरी कामगार पक्ष

१९७९ च्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर त्यांनी शेकापच्या सक्रिय राजकारणात प्रवेश केला. १९९५ मध्ये विवेक पाटील यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

३ मार्च १९९८
पहिल्यांदा खासदार

कुलाबा मतदारसंघातून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. पूर्वीच्या खासदारांनी न वापरलेला निधीही मंजूर करून त्यांनी विकासकामांसाठी वापरला.

१९९९ – २००४
पुन्हा एकदा लोकसभा

१३ महिन्यांत सरकार कोसळल्यानंतर १९९९ मध्ये ते पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून आले. संसदेत प्रकल्पग्रस्त, गॅस वितरण, विशेष आर्थिक क्षेत्र असे प्रश्न त्यांनी मांडले.

रायगड काँग्रेसला नवसंजीवनी

२००४ मध्ये लोकसभा विसर्जित झाल्यानंतर “यापुढे मी कोणतीही निवडणूक लढविणार नाही” असे त्यांनी जाहीर केले. ५ डिसेंबर २००४ रोजी हजारो कार्यकर्त्यांसह त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा गड भेदून त्यांनी प्रशांत ठाकूर यांना पनवेलचे आमदार केले. २०१४ मध्ये राहुल गांधींनी निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला, तेव्हाही त्यांनी नम्रपणे नकार दिला.

टोलनाका आंदोलन

खारघर टोलनाका रद्द व्हावा यासाठी ११ जुलै २०१४ रोजी त्यांनी रास्ता रोको केला. सरकारने दखल न घेतल्याने ९ ऑक्टोबर २०१४ रोजी पनवेल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि १२ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रशांत ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.

पनवेलमध्ये कमळ फुलले

२०१४ मध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. २०१६ मध्ये पनवेल नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. २०१७ च्या पहिल्या निवडणुकीत भाजपाने ७८ पैकी ५१ जागा जिंकल्या, तर २०२६ मध्ये ७८ पैकी ६० जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. २०२६ मध्ये रायगड जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजपाचा अध्यक्ष विराजमान झाला.

२०१४ भाजपा प्रवेश
२०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश

महत्वाचे टप्पे

७५ वर्षांचा प्रवास

कालखंडावर क्लिक करा आणि त्या काळातील महत्त्वाचे टप्पे पाहा.

लोकनेते २००५–२०२६

  • २००६ राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा आणि आगरी-कोळी महोत्सवाची सुरुवात.
  • २००९ प्रशांत ठाकूर पनवेलचे आमदार.
  • २००९-१० भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाची स्थापना.
  • २०१०-११ खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि द्रोणागिरी येथे भागूबाई चांगू ठाकूर विद्यालय.
  • २०११ ३ एप्रिल रोजी ‘रयत माऊली पुरस्कार’.
  • २०१४ प्रशांत ठाकूर यांच्यासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश.
  • २०१६ लोकनेत्यांच्या जन्मदिनी झालेल्या अखंड भजन उपक्रमाची ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद.
  • २०२२ न्हावा खाडी येथे ‘रामबाग’ उद्यानाचे लोकार्पण (२२ डिसेंबर); रयत शिक्षण संस्थेच्या ‘रामशेठ ठाकूर भवन’चे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन.
  • २०२४ ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव’ पुरस्कार.
  • २०२४-२५ उलवे येथे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची सुरुवात.
  • २०२६ पनवेल महानगरपालिकेत भाजपाला ७८ पैकी ६० जागा; ‘रामपर्व’ जीवनग्रंथाचे प्रकाशन.
२०१४ भाजपा प्रवेश
२०१४ भाजपा प्रवेश
रामबाग, न्हावा खाडी
रामबाग, न्हावा खाडी
राज्यपालांच्या हस्ते सन्मान
राज्यपालांच्या हस्ते सन्मान
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल

पुरस्कार आणि सन्मान

पुरस्कारसमृद्ध रामशेठ

काही पुरस्कारांनी व्यक्ती मोठी ठरते, तर काही व्यक्तींमुळे पुरस्कार मोठे होतात. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांतील अद्वितीय कार्यासाठी अनेक संस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा गौरव केला आहे. “खासदारकीला निवडून आलेल्या आनंदापेक्षा रयत माऊली पुरस्काराचा आनंद मोठा आहे,” अशी त्यांची भावना आहे.

महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान
रयत माऊली पुरस्कार
३ एप्रिल २०११

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कुटुंबीयांकडून दिला जाणारा हा पुरस्कार रामशेठ यांनी आपल्या जीवनातील सर्वोच्च सन्मान मानला आहे.

इंटरनॅशनल गोल्ड स्टार अवॉर्ड
२८ मे २००८, बँकॉक

इंडो-थाई फ्रेंडशिप परिषदेत थायलंडच्या कामगारमंत्र्यांच्या हस्ते प्रदान.

राजीव गांधी एक्सलन्स अवॉर्ड
१८ सप्टेंबर २००९

इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी, नवी दिल्ली यांच्या वतीने प्रदान.

बहुजन रत्न पुरस्कार
१४ एप्रिल २०१७

अविरत लोकसेवेला सलाम म्हणून रायगड जिल्हा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सन्मान.

इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार

इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला यांच्या ४५ व्या पुण्यतिथी सोहळ्यात प्रदान.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार
७ जानेवारी २०२४

सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांतील प्रेरणादायी कार्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते.

गुणवंत रयत सेवक पुरस्कार

रयत सेवक संघ, सातारा यांच्या वतीने सेवाभावी कार्याबद्दल सन्मान.

समाजभूषण पुरस्कार

समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान.

आरेकर पुरस्कार

होळकर प्रतिष्ठान, कर्जत (रायगड) यांच्या वतीने प्रदान.

अप्पासाहेब पाटील पुरस्कार

श्रीरामपूर येथील सोहळ्यात प्रदान.

समाजरत्न पुरस्कार

सामाजिक कार्याबद्दल सन्मान.

प्रियदर्शनी कर्तृत्व गौरव पुरस्कार २०१०
२०१०

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या कार्याबद्दल प्रियदर्शनी फाउंडेशनकडून.

प्रेरणादायी विचार

विचारांचे धन

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा आणि आई-वडिलांचे संस्कार यांतून घडलेल्या लोकनेत्यांचे काही विचार.

मला परमेश्वर देत गेला. जे मिळाले ते माझे नाही, त्या परमेश्वराचे आहे; ते मी त्याला अनेक रूपांनी परत करतो आहे.
— लोकनेते रामशेठ ठाकूर
कष्टाने कमावलेले काहीही असो, ते वाया जाऊ द्यायचे नाही.
— वडील चांगू काना ठाकूर यांची शिकवण
पुतळा उभारून काय होणार? भगतसाहेबांना पुढची पिढी शिकलेली पाहायची होती; त्यांची ती इच्छा त्यांच्या नावाने शिक्षण संस्था काढून आपण पूर्ण करू.
— जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्थापनेवेळी
इमारतीसाठी पैसे कितीही खर्च होऊ देत; शाळा सुंदर, स्वच्छ आणि आधुनिक असल्याच पाहिजेत.
— शाळांच्या उभारणीबद्दल
खासदारकीला निवडून आलेल्या आनंदापेक्षा ‘रयत माऊली’ पुरस्काराचा आनंद मोठा आहे.
— रयत माऊली पुरस्कार स्वीकारताना
मी यापुढे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे; यापुढे मला फक्त पक्षासाठी आणि लोकांसाठी काम करायचे आहे.
— राजकीय निवृत्तीच्या निर्णयाबद्दल

संदर्भ: ‘रामपर्व’ – विजय इंदूकेशव पवार (मे २०२६)